दाभोळ : अनियमित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

banner 468x60

दाभोळ व परिसरातील अनियमित, कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा, रखडलेली वीज कामे, तसेच स्मार्टमीटर बसविण्यासाठी करण्यात येणारी सक्ती या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे महावितरणच्या दाभोळ कार्यालयावर आज विराट मोर्चा काढण्यात आला. पंचक्रोशीतील शेकडो शिवसैनिक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा मोर्चा अतिशय आक्रमक वातावरणात पार पडला.

दाभोळसह आसपासच्या वणौशी, नवसे, कोळथरे, ओणी-भाटी, गुडघे, देर्दे, भिवबंदर, दुमदेव आदी गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा अत्यंत अनियमित झाला आहे. कमी दाबाची वीज, वारंवार होणारे ट्रिपिंग, धोकादायक झालेले खांब बदलण्यात होत असलेला विलंब, तसेच 11 केव्ही लाईनवरील एबी स्विच बसविण्यासाठी होत असलेली दिरंगाई यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

banner 728x90


त्यातच महावितरण विभागातील जबाबदार अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहणे आणि स्मार्टमीटर बसविण्यासाठी जबरदस्ती करणे, यामुळे ग्रामस्थ आणि शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

दाभोळ शिवसेना शाखा कार्यालयातून सकाळी ११:४० वाजता मोर्चास सुरुवात झाली. पंचक्रोशीतील शेकडो शिवसैनिक, ग्रामस्थ, महिला व युवकांचा यात सहभाग होता. फेरीबोट जेठी, दाभोळ बाजारपेठ, गुजर आळी या मार्गाने मोर्चा महावितरणच्या दाभोळ कार्यालयावर धडकला.


मोर्चादरम्यान संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

“नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची”,
“महावितरणच्या स्टाफचे करायचे काय? खाली डोके वरती पाय”,
“लावणार नाही लावणार नाही, स्मार्टमीटर लावणार नाही”,
“शिवसेना जिंदाबाद”.

अधिकार्‍यांना धारेवर धरले

मोर्चा कार्यालयात पोहोचताच उपस्थित दापोलीचे उपकार्यकारी अभियंता अरविंद कुकडे आणि कनिष्ठ अभियंता विवेक येलवे यांना संतप्त ग्रामस्थांनी व शिवसैनिकांनी धारेवर धरले. महावितरण विभागाकडून रखडलेल्या कामांची जबाबदारी स्विकारत पुढील महिन्याभरात सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दोन्ही अधिकार्‍यांनी दिले. हे आश्वासन दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

शिवसैनिकांनी अधिकार्‍यांना चेतावणी दिली की, “महिन्याचे काम दीड महिन्यापेक्षा उशिरा पूर्ण झाले तर पुन्हा आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात होईल.”

मोर्चाचे नेतृत्व दाभोळ शिवसेना शाखाप्रमुख रमाकांत दाभोळकर यांनी केले. त्यांच्या बरोबर वणौशी, उसगाव, नवसे, कोळथरे, ओणी-भाटी, गुडघे, देर्दे, दुमदेव, भिवबंदर या गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चाच्या शेवटी सर्वांनी एकमुखाने ठरविले की, जर दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण झाली नाहीत, तर पुढील वेळी संपूर्ण पंचक्रोशीतील जनता रस्त्यावर उतरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *