चिपळूण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शंकरवाडी येथील 65 वर्षीय वृद्ध वयोवृद्ध व्यक्ती,. वसंत बाळकृष्ण लोटेकर, हे 19 ऑगस्ट पहाटेपासून अचानक बेपत्ता झाले आहेत.
चिपळूण तालुक्यात सध्या पूरसदृश परिस्थिती असताना ही घटना घडल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,. वसंत लोटेकर हे शंकरवाडी, मारुती मंदिरासमोर राहतात. त्यांची मुलगी. मनाली खेराडे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. मनाली खेराडे यांच्या जबाबानुसार, 19 ऑगस्ट रोजी पहाटे 4:00 ते 6:00 च्या सुमारास त्यांचे वडील घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. सकाळी 6:30 वाजता त्यांच्या आतेभावाने त्यांना फोन करून वडिलांच्या बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने मनाली आणि त्यांचे पती माहेरी पोहोचले.
घरात चौकशी केली असता, आईने सांगितले की पहाटे 4:00 च्या सुमारास वडिलांना जाग आली आणि ते उठून बसले. त्यावेळी आईने त्यांना ‘अजून वेळ आहे’ असे सांगितले आणि त्या पुन्हा झोपी गेल्या. सकाळी 6:00 वाजता उठल्यावर घराचा पुढील दरवाजा उघडा दिसला आणि वडील घरात नव्हते.
लोटेकर हे सकाळी 5:30 वाजता नियमितपणे चालण्यासाठी बाहेर जातात. मात्र, 19 ऑगस्ट रोजी चिपळूणमध्ये पूर असल्यामुळे शहरात पाणी भरले आहे. या परिस्थितीत ते नेमके कुठे गेले असतील, याबाबत कुटुंबीयांना काहीच माहिती नाही. नातेवाईकांनी शंकरवाडी आणि चिपळूण परिसरात त्यांचा शोध घेतला, पण ते कुठेही सापडले नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. वसंत लोटेकर यांचे वय 65 वर्षे असून त्यांची उंची 5 फूट 5 इंच आहे. त्यांचा बांधा सडपातळ आणि वर्ण सावळा आहे. त्यांच्या डोक्यावरील केस विरळ आणि पांढऱ्या-काळ्या रंगाचे आहेत. त्यांची मिशी पांढरी असून त्यांनी दाढी केली आहे. अंगात सफेद रंगाची बनियान, निळ्या रंगाचा बरमुडा घातला असून पायात चप्पल नाही. गळ्यात सोन्याची चेन, छातीवर काळ्या रंगाचा तीळ आणि उजव्या हाताच्या मनगटावर पांढरा दोरा बांधलेला आहे.
चिपळूण पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली असून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा शोध सुरू केला आहे. पूर परिस्थितीमुळे शोधकार्यात अडचणी येत असल्या तरी, पोलीस आणि कुटुंबीय लवकरात लवकर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जर कोणालाही. वसंत लोटेकर यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने चिपळूण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*