चिपळूण : नाशिकमध्ये झालेल्या अपघातात चिपळुणातील 3 सख्ख्या भावंडांचा मृत्यू

banner 468x60

गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन करून परत येत असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव फाट्याजवळ कंटेनरखाली कार दबल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात चिपळूण तालुक्यातील तोंडली-सडेवाडी येथील तिघा सख्ख्या भावंडांचा समावेश असल्याने गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

banner 728x90


या अपघातात कारमधील नित्यानंद सावंत (वय ६५), विद्या सावंत (वय ६२), वीणा सावंत (वय ६८) असे सावंत कुटुंबातील दोन बहिणी आणि एक भाऊ तसेच चालक दत्ता अंबराळे (वय ४२) या चौघांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत अंधेरी, मुंबई येथे राहणारे हे सावंत कुटुंबीय कारमधून इगतपुरी तालुक्यातील शेणवड (गरुडेश्वर) येथील माऊली रामदासबाबा मठात दर्शनासाठी आले होते.


दुपारी दर्शन झाल्यानंतर ते सुमारतः दोन वाजता परतीच्या मार्गावर होते. मुंढेगाव फाट्याजवळ त्यांची कार रसायनयुक्त पदार्थांची राख घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरखाली कार पूर्णपणे दबल्याने ती फरफटत गेली आणि कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

या चौघांपैकी नित्यानंद सावंत हे मुंबई महानगरपालिकेत, तर वीणा सावंत या एमटीएनएलमध्ये निवृत्त कर्मचारी होत्या. मृत झालेली तिन्ही भावंडे अविवाहित होती. अपघातानंतर कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.


सावंत कुटुंबीय मूळचे तोंडली गावचे असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त गावात उशिरा समजले. त्यामुळे अनेकांनी तात्काळ मुंबईकडे धाव घेतली. सर्व मृतदेह अंधेरी येथील निवासस्थानी नेण्यात आले असून शुक्रवारी वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उद्योगधंद्यानिमित्त सावंत कुटुंब मुंबईत स्थायिक झाले असले तरी त्यांचे गावात घर असून ते सणावारासह मे महिन्यात गावी येत असत. त्यांच्या अचानक अपघाती निधनाने गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात दोन बहिणी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *