चिपळूण : मोठा अनर्थ टळला डोळ्याची पापणी लवण्याआधीच रेल्वे निघून गेली

banner 468x60

चिपळूणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधार पडला असताना ,रेल्वे फाटकही उघडे होते, अशात अचानक रेल्वेचा आवाज आला आणि पापणी लवण्याआधीच समोरून रेल्वे निघून गेली.

banner 728x90

हा धक्कादायक प्रकार चिपळूण कळबंस्ते रेल्वे फाटकाजवळ शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता अनेकांनी अनुभवला. अनेक वर्षात पहिल्यांदाच हा प्रकार घडला.

अनेकांनी प्रसंगावधान राखत फाटकापासून बाजूला पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला. काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याची माहिती पुढे येत आहे.

शहरालगतच्या कळंबस्ते रेल्वे फाटक येथे शनिवारी २२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिपळूणवरुन रत्नागिरीकडे धावणारी प्रयागराज एक्सप्रेस फाटक न पडताच निघून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गेली अनेक वर्षापासून कळंबस्ते रेल्वे फाटक येथे उड्डाण पुल करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम हे वर्षानुवर्षे याविषयाचा पाठपुरावा करीत आहेत.

मात्र त्यांच्या या मागणीला यश आलेले नाही. कळबंस्ते येथून खेड हद्दीतील पंधरागाव विभागात जाण्याचा प्रमुख एकमेव मार्ग आहे.

चिपळूण व खेड तालुक्याच्या जोडणाऱ्या या महत्वपुर्ण मार्गावर रेल्वे फाटकाचा नियमीत अडथळा निर्माण होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर जलद व अन्य गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

दिवसभरात ६० हून अधिक फेऱ्या या मार्गावर होत असल्याने त्या कालावधीत कळंबस्ते येथील रेल्वे फाटक बंद ठेवावे लागते. परिणामी दोन्ही बाजूने वाहने अडकून पडलेली असतात.

याशिवाय विद्यार्थी, कामगार वर्गाची देखील मोठी गैरसोय नियमीत होत असते. चिपळूण व खेड हद्दीतील ५० हून अधिक गावांकडे जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने येथे उड्डाणपुल व्हावा म्हणून अनेकदा निवेदने व निदर्शने करण्यात आली.

कोकण रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेऊन येथे उड्डाणपुल उभारण्याचा निर्णय देखील घेतला. त्याचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक बाबीही पुर्ण केल्या. रेल्वे प्रशासनाने ५० टक्के निधीची तरतूद केली. मात्र महाराष्ट्र शासनाकडून निधीची तरतूद झालेली नाही.

परिणामी या रेल्वे फाटकाचा अडथळा कायम राहिला आहे. उड्डाणपुलासाठी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम, आमदार शेखर निकम पाठपुरावा करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने येणा-या काळात पुलासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.

आमदार निकम यांच्या सोबत उपमुख्यमंत्र्यांची भेट घेवुन रेल्वे पुल किती महत्वाचा आहे हे निदर्शनास आणुन देणार असल्याचे शौकत मुकादम यांनी सांगितले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *