चिपळूण शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहर शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन देण्यात आले.
हे निवेदन प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी स्विकारले. येत्या चार दिवसांत भटक्या कुत्र्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने नगर पालिकेला जाब विचारू तसेच शहरातील भटके कुत्रे पकडून थेट नगर पालिकेत आणून सोडू, असा इशारा शहरप्रमुख उमेशदादा सकपाळ यांनी या वेळी दिला.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ९ सप्टेंबर रोजी सकाळी शहरातील एका ज्येष्ठ नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची व्यथा सांगणारी ऑडिओ क्लिप शहरभर व्हायरल झाली असून, त्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःवर सलग दोन कुत्र्यांनी हल्ला केल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच आपल्या नातीला शाळेत नेताना तिच्यावर असा हल्ला झाला तर काय करावे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगर परिषदेच्या वतीने अधूनमधून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवली जाते, मात्र ती अपुरी ठरत असून शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या सतत वाढत आहे. नुकतीच जन्माला आलेली पिल्लेही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसत असून, यामुळे लहान मुलांवर तसेच ज्येष्ठ नागरिकांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. त्यानुसार शहरभर नियोजनबद्ध पद्धतीने भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम हाती घ्यावी, निर्बीजीकरण मोहिमेला सातत्य द्यावे, हल्लेखोर कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे आणि या सर्व प्रक्रियेचे ठोस वेळापत्रक जाहीर करून नागरिकांना विश्वासात घ्यावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
जर तातडीने ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी शिवसेना शैलीत रस्त्यावर उतरून कृती करावी लागेल, असा स्पष्ट इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या वेळी अंकुश आवले, विनोद पिल्ले, प्रमोद बुरटे, कपिल शिर्के, जयराम भागवत, नील शेट्ये, साई घडशी, धीरज नलावडे, विनायक रेडीज, संजय घाडगे, नागेश काजवे, दया जुवळे, ओंकार टकले, गणेश भालेकर, शहर प्रमुख प्राजक्ता टकले, स्वाती दांडेकर, सुकन्या चव्हाण, राणी महाडिक, तृप्ती कदम, प्रिया शिंदे, संध्या घाडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*