चिपळूण : गंभीर आजारपणाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील असुर्डे साळवीवाडी येथे एका ४९ वर्षीय महिलेने दीर्घकाळ सुरू असलेल्या गंभीर आजारपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची अत्यंत दु:खद घटना घडली आहे. शर्वरी संतोष साळवी असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.


माहितीनुसार, शर्वरी साळवी या गेल्या काही काळापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर नियमित वैद्यकीय उपचार सुरू होते, मात्र आजारामुळे त्यांना प्रचंड शारीरिक वेदना सहन कराव्या लागत होत्या. याचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरही गंभीर परिणाम झाला होता. सततच्या वेदना, औषधोपचार आणि अनिश्चिततेमुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या.


१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. त्या वेळी घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. एकटेपणाचा फायदा घेत त्यांनी आपल्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी चॅनलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळानंतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांना माहिती दिली.
मात्र, घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच शर्वरी साळवी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. १ एप्रिल रोजी सायंकाळी ५:०८ वाजता अधिकृत नोंद झाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, असह्य आजारपण आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.


शर्वरी साळवी या स्वभावाने अत्यंत शांत, नम्र आणि सुशिक्षित म्हणून परिसरात ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. साळवीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *