चिपळूण तालुक्यातील पाटण मिरासवाडी येथील शिरळ-मिरासवाडी रस्त्यालगत बेकायदेशीरपणे खैर वृक्षांची तोड करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरोधात पाटण वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 11 संशयित आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जुनेद तन्वीर डांगे, संजय रामचंद्र पवार, गणेश नारायण पंडव (रा. पोफळी, ता. चिपळूण), रविंद्र गोपाळ कदम, विजय कोंडीबा माने, अनिल कोंडीबा खरात, कोंडीबा भागोजी ढेबे, जनार्दन भागोजी ढेबे, जानू भागोजी ढेबे, बाब सोनू ढेबे (रा. पेढांबे, ता. चिपळूण), मनोहर दत्ताराम साबळे (रा. दळवटणे, ता. चिपळूण) यांचा समावेश आहे. मंगळवार, 2 डिसेंबर रोजी वनविभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.
संशयित आरोपींकडून महिंद्रा पिकअप, टाटा मॅजिक व खैर सोलीव लाकूड माल 49 नग (0.425 घनमीटर) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यास वर्षभर कारावास किंवा 5 हजार रुपये दंड अथवा दोन्ही अशी तरतूद आहे. कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल निलेश कुंभार, वनरक्षक निखील कदम, रोहित लोहार, विलास वाघमारे व अयोध्या रन्हेर यांनी केली. पुढील तपास वनपाल कुंभार करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













