पूर्व वैमनस्यातून राग मनात धरुन खेडकडे जाणाऱ्या एका कारला मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथे अडवण्यात आले.
यावेळी कारमधील तिघांना 10 जणांनी फिल्मी स्टाईलने मारहाण केली. या प्रकाराने चिपळुणात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांचा समावेश असून याप्रकरणी 10 जणांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यापैकी तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह शाहिद सरगुरे, फैजल मेमन, मोईन पेचकर, महमद खान, फहद खान, निहाल अलवारे, हनिफ रुमाने, मुजफर इनामदार, शहिबाज दळवी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद मुनावर अहमद बोट (42, असगणी) यांनी दिली आहे. तर या मारहाणीत बोट यांच्यासह उस्मान हसन झगडे, महमद अली (दोघे-असगणी) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मेटे-मोहल्ला येथे जमिला शहा यांचा मुलगा तारीक याचा वाद झाल्याने त्याची माहिती जमिला यांनी त्यांचा भाऊ साजिद याला दिली.
या पार्श्वभूमीवर चिपळूणहून साजिदसह शाहिद सरगुरोह हे तेथे गेले असता त्याठिकाणी पुन्हा वाद झाला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा वाद मिटावा यातून सलोखा निर्माण व्हावा यासाठी मुनावर बोट यांच्यासह उस्मान झगडे व महमद अली हे 6 रोजी चिपळूण येथे आले होते.
मात्र वाद न मिटल्याने रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा कारने खेडच्या दिशेने जात होते. यावेळी साजिदसह 10 जण मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात थांबले. त्यांनी कार येताच ती थांबवून त्यातील मुनावर बोट, उस्मान झगडे, महमद अली यांना फिल्मी स्टाईलप्रमाणे लोखंडी रॉड, दगडाच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. यात मुनावर यांच्या हाताला तर उस्मान झगडे, महमद अली यांना देखील दुखापत झाली.
याबरोबरच कारच्या दोन्ही बाजूच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.याप्रकरणी साजिद याच्यासह वरील 10 जणांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी निहाल, शाहबाज, मुजफर या तिघांना अटक करण्यात आली असून शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास जाधव करीत आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*