चिपळूण : पंचायत समिती सभापतीपदी सूर्यकांत खेतले, उपसभापतीपदी संदेश आयरे बिनविरोध

banner 468x60

चिपळूण येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे संदेश आयरे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीवर १४ जागा जिंकणाऱ्या महायुतीचा झेंडा फडकला आहे.

banner 728x90 banner 728x90

मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.

सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे संदेश आयरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.


यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत ७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ४ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

सुरुवातीला आमदार शेखर निकम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा होती. मात्र जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्ता स्थापनेत सहभाग घेतला आणि सभापतीपद आपल्या पारड्यात पाडले.
नवनिर्वाचित सभापती सूर्यकांत खेतले आणि उपसभापती संदेश आयरे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *