चिपळूण : एम. ई.एस. परशुराम रुग्णालयाच्या उपकेंद्राची चिपळूणमध्ये सुरुवात, बाह्यरुग्ण विभाग उपकेंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न

banner 468x60

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित एम.ई.एस. परशुराम हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, अमनोरा येस्स फाउंडेशन, सिटी ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बाह्यरुग्ण विभाग उपकेंद्र, शाखा – चिपळूण याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या उपकेंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणचे उपाध्यक्ष उदय वेल्हाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

banner 728x90

हा उद्घाटन समारंभ ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता चिपळूण शहरातील शॉप नं. ०३, एव्हरशाईन, बी-बिल्डिंग, बहाद्दूरशेख नाका, चिपळूण येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणचे विविध पदाधिकारी , एम.इ.एस. आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्यसेवेशी संबंधित मान्यवर,

एम.ई.एस. परशुराम हाॅस्पिटलचे विविध कर्मचारी, तसैच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी एम.इ.एस. आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित पाटील व एम.ई.एस. परशुराम हाॅस्पिटलचे वैद्यकीय उपअधीक्षक, अनुपम अलमान तसेच सदर उपकेंद्राचे समन्वयक डाॅ. प्रदीप इंगळे उपस्थित होते.


मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून उपकेंद्राचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना उदय वेल्हाळ यांनी सांगितले की, चिपळूण व परिसरातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व परवडणारी आरोग्यसेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. एम.ई.एस. परशुराम हॉस्पिटलसारख्या नामांकित संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे बाह्यरुग्ण विभाग उपकेंद्र नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओपीडीची वेळ सकाळी आणि संध्याकाळी सुरू राहणार आहे.

एम.इ.एस. आयुर्वेद महाविद्यालय व एम.ई.एस. परशुराम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे या १८६० साली स्थापन झालेल्या नामवंत शैक्षणिक संस्थेअंतर्गत कार्यरत आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना तपासणी, प्राथमिक उपचार व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे.


गरजू रुग्णाच्या पुढील उपचारांची व्यवस्था एम.ई.एस. परशुराम हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, घाणेखुंट-लोटे ता. खेड येथील मुख्य शाखेत केली जाईल.
या नव्या उपकेंद्रामुळे चिपळूण शहरासह तालुका व परिसरातील रुग्णांना उपचारासाठी दूर प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे वेळ, खर्च व गैरसोय कमी होऊन आरोग्यसेवा अधिक सुलभ होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.


महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे व अमनोरा येस्स फाउंडेशन, सिटी ग्रुप, पुणे येथील पदाधिकाऱ्यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन समारंभ यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी संबंधित संस्था, कर्मचारी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *