आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) महाराष्ट्र राज्य महिला डॉक्टर विंग कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ. कांचन मदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी ही नियुक्ती जाहीर केली. या नियुक्तीमुळे राज्यभरातील महिला डॉक्टरांच्या विविध प्रश्नांना संघटित व प्रभावी व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
डॉ. कांचन मदार या अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकोलॉजिस्ट) असून त्या मेडिको-लीगल कन्सल्टंट म्हणूनही कार्यरत आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्या WSW (Women Support Women) या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष असून महिलांचे आरोग्य, कायदेशीर साक्षरता, कार्यस्थळावरील सुरक्षितता तसेच व्यावसायिक संरक्षण या विषयांवर त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.
आयएमए महाराष्ट्र महिला डॉक्टर विंगच्या माध्यमातून महिला डॉक्टरांना भेडसावणाऱ्या व्यावसायिक, कायदेशीर व मानसिक अडचणी, कार्यस्थळावरील भेदभाव, सुरक्षिततेचे प्रश्न तसेच वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर मार्गदर्शन व सहकार्य देण्यावर डॉ. मदर यांचा विशेष भर राहणार आहे. महिला डॉक्टरांसाठी प्रशिक्षण शिबिरे, कायदेशीर मार्गदर्शन कार्यशाळा, आरोग्यविषयक जनजागृती मोहिमा तसेच सल्ला व सहकार्याचे मंच उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयएमए महाराष्ट्र राज्य महिला डॉक्टर विंग कमिटीत पदसिद्ध सदस्य (एक्स-ऑफिशिओ) म्हणून आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांचा समावेश आहे. या अनुभवी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली महिला डॉक्टर विंग अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. कांचन मदार यांच्या नियुक्तीबद्दल राज्यभरातील डॉक्टर समुदायाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आयएमए महाराष्ट्र महिला डॉक्टर विंग अधिक परिणामकारक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













