चिपळुण : गोवळकोट गोळीबार प्रकरणी विशाल पवार, नितिन होळकर दोघांना अटक, विनापरवाना बंदूक जप्त

Screenshot

banner 468x60

चिपळूण शहरातील गोवळकोट रोड येथील हायलाईफ इमारतीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. या घटनेत बंदुकीची गोळी थेट खिडकीची काच फोडत स्वयंपाकघरात शिरली होती. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.


पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींमध्ये विशाल विजय पवार (वय ३६, रा. पेठमाप) आणि नितिन धोंडू होळकर (वय ३०, रा. कोंढे) यांचा समावेश आहे. या दोघांनी डुकराच्या शिकारीसाठी गोळी झाडली होती. विशेष म्हणजे, नितिन होळकर याच्याकडे असलेली बंदूक ही विनापरवाना होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी ही बंदूक जप्त केली असून, दोघांनाही न्यायालयाने न्यायालयी कोठडीत पाठवले आहे.

banner 728x90


ही घटना २९ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. हायलाईफ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अशरफ तांबे यांच्या स्वयंपाकघरात अचानक एक मोठा आवाज झाला. पाहता पाहता एक गोळी खिडकीची काच फोडत थेट घरात घुसल्याचे त्यांच्या लक्षात आले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाच्या दरम्यान पोलिसांना ही गोळी शिकारीच्या हेतूने झाडल्याची माहिती मिळाली. याच धाग्यावरून तपास अधिक खोलात नेण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल पवार आणि नितिन होळकर यांना ताब्यात घेतले.

चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. विशाल पवार याची शेती हायलाईफ इमारतीच्या बाजूलाच आहे. त्या भागात डुकरांचा वावर असल्याने त्याने नितिन होळकर याला शिकार करण्यासाठी बोलावले होते. नितिनने सिंगल बोअर बंदुकीतून गोळी झाडली; मात्र नेम चुकल्याने गोळी थेट अशरफ तांबे यांच्या घरात शिरली.


या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, प्रितेश शिंदे, रोशन पवार, रुपेश जोगी आदींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
या घटनेमुळे चिपळुणात एकच खळबळ माजली असून, नागरिकांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *