चिपळूण तालुक्यातील दहीवली खुर्द येथील एका कात उद्योगावर गुरुवारी पहाटे जीएसटी विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सावर्डे परिसरात महिनाभरात ही सलग दुसरी कारवाई आहे. मात्र, याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, अधिकृतपणे कोणतीच माहिती पुढे आलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच सावर्डे येथील एका कात उद्योजकावर ईडीचा छापा पडला होता. सलग दोन दिवस ईडीचे पथक तिथे ठाण मांडून होते. मात्र, या कारवाईनंतर त्याचे पुढे काय झाले हे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही. या कारवाईदरम्यान काही प्रमाणात बेकायदेशीर लाकूडसाठाही आढळला होता. मात्र, त्याबाबतही नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, हे अद्याप उघड झालेले नाही.
या कारवाईनंतरही सावर्डे परिसरातील कात कारखाने तितक्याच जोमाने सुरू आहेत. सावर्डे पंचक्रोशीतील दहीवली खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून कात कारखाना सुरू आहे. गुरुवारी पहाटे ५:३० वाजता जीएसटी अधिकारी पथकाच्या गाड्यांचा ताफा दहीवली गावात दाखल झाला. पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकाने कारखान्याचा परिसर पूर्णत: ताब्यात घेत मुख्य प्रवेशद्वारावर सीआयएसएफचे जवान तैनात केले.
कारखान्याच्या आत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही, तसेच बाहेरूनही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत अधिकारी कारखान्यात तळ ठोकून होते. मात्र, नेमके काय निष्पन्न झाले हे स्पष्ट झालेले नाही. जीएसटीचे अधिकाऱ्यांनी पहाटेच छापा टाकला. मात्र, या छाप्यात पथकाने नेमके काय पाहणी केली? पथकाच्या हाती काही लागले आहे? हा छापा नेमका कशासाठी हाेता? याबाबतची सारी माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













