चिपळूण : शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, भास्कर जाधव यांचे कृषिमंत्र्यांना पत्र

banner 468x60

कोकणातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकाचे पाऊस, वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री यांच्यासह कृषी तसेच मदत व पुनर्वसनमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

banner 728x90

आमदार जाधव यांच्या निवेदनानुसार, कोकणात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भिजून आडवे पडले आहे, त्यांना पुन्हा कोंब फुटले आहेत तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके अक्षरशः सडत आहेत.

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त असून, शासनाने याची दखल घेऊन तत्काळ पंचनाम करावेत. कोकणातील शेतकरी कितीही नुकसान झाले, संकटात सापडला, अन्याय झाला किंवा कर्जबाजारी असला तरी आत्महत्या करत नाही. त्यामुळे सरकार कोकणातील शेतकऱ्यांकडे कायमच दुर्लक्ष करत आले आहे;

परंतु या वेळची परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही बाब लक्षात घेऊन मराठवाडा, विदर्भात यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना राज्य सरकारने दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *