राज्य गृहमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती समोर येत आहे. योगेश कदम हे काल बीडच्या दौऱ्यावर होते. मस्साजोग येथे संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली.
राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चक्क माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर गहाळ झाला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बीडमध्ये गृहराज्यमंत्र्यांचाच मोबाईल गहाळ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. योगेश कदम हे काल बीड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांचा मोबाईल गायब झाला.
शुक्रवारी योगेश कदम यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनासाठी भेट घेतली. या भेटीत माध्यमांचे कॅमेरे उपस्थित होते. यावेळी योगेश कदम यांचा मोबाईल अचानक गायब झाला. योगेश कदम यांचा मोबाईल गायब झाल्याचे माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे.
केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार
योगेश कदम यांचा मोबाईल गहाळ झाल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, राज्याच्या गृहमंत्र्यांचा मोबाईलच सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची हमी कशी मिळणार? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
योगेश कदमांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण
दरम्यान, या प्रकरणावर आता राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. योगेश कदम यांचा मोबाईल हरवलेला नाही. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हरवल्याची माहिती योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
योगेश कदमांचा देशमुख कुटुंबियांना शब्द
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. घटनेतील एक आरोपी वगळता सर्व जेलमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी योगेश कदम यांनी पोलीस प्रशासनाला ही घटना
जेव्हा घडली तेव्हा कर्तव्यावर असलेले सर्व अंमलदार, हवालदार यांची बदली करा. मी कोणाचीही गय करणार नाही, माझ्या राज्यात असले चाळे चालणार नाहीत, मी बडतर्फ करेन, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना सोडायचे नाही. कोणीही असेल तर कारवाई करा, अशा सूचना दिल्या.बीडच्या जेल मधील व्हीआयपी ट्रीटमेंटची माहिती घेऊन कारवाई करणार, आरोपी स्थलांतर बाबत मी
मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. वाल्मिक कराड गँगला इतर कारागृहात हलविण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून सांगणार आहे, असेही योगेश कदम यांनी सांगितले. तसेच संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशी झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो न्याय दिला, जायचा तसाच न्याय दिला जाईल, असा शब्द योगेश कदम यांनी देशमुख कुटुंबियांना दिला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















