गुहागर : सायकलवरून आले मात्र प्रयत्न फसला, चार शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न

banner 468x60

गुहागर तालुक्यातील झोंबडी येथे शाळा सुटल्यानंतर घरी चाललेल्या चार शाळकरी मुलांचे सायकलवरून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मुलांनी हिसका मारून आरडाओरड केल्याने त्यांचा प्रयत्न फसला.

ही घटना झोंबडी बौद्धवाडी पुलाजवळ बुधवारी (दि.१८) सायंकाळी घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी सायंकाळी गुहागर तालुक्यातील झोंबडी येथील शाळेतून चालत घरी चाललेल्या इयत्ता दुसरी ते चौथीच्या वर्गात

शिकणाऱ्या चार शाळकरी मुलांना झोंबडी बौद्धवाडी पुलाजवळ सायकलवरून आलेल्या चार अज्ञात इसमानी थांबवले. आजूबाजूला घर किंवा कोणीच नसल्याने या अज्ञातांनी मुलांना दमदाटी करून पाईपने मारहाण केली व चार मुलांचे हात बांधले आणि सायकलवरून घेऊन जाऊ लागले.

मुलांनी त्यांच्या हाताला हिसका देत आरडाओरड करुन पळ काढला. घडलेला हा सर्व प्रकार मुलांनी आपल्या घरी पालकांना सांगितला. त्यानंतर गुरुवारी पालकांनी शाळेच्या शिक्षकांना घडलेला प्रकार सांगून गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चौघांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देत याप्रकरणी तपास सुरू केला आहे. घटनेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अज्ञात इसमांना शाळकरी मुलांचे अपहरण करायचे होते, मग ते सायकलवरून का आले, असा प्रश्न पोलिसांबरोबरच नागरिकांनाही पडला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *