चिपळूण : चार अपघातानंतर नगर परिषदेला जाग, बहादूरशेख नाक्याजवळील नाल्यावर संरक्षक कठडा उभारणार

banner 468x60

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरातील राधाकृष्ण नगरच्या प्रवेशद्वाराजवळ आतापर्यंत चार अपघात झाले आहेत. अखेर चार अपघातानंतर नगर परिषदेला जाग आली आहे. नाल्यावर चिपळूण नगरपरिषदेच्या वतीने संरक्षक कठडा आणि त्यावर बॅरिकेट्स उभारण्यात येणार आहेत. याबाबत प्रभागातील नगरसेविका अंजली कदम आणि बांधकाम सभापती कपिल शिर्के यांनी प्रशासनाला सूचना दिल्यानंतर या ठिकाणी पाहणी करण्यात आली.

banner 728x90 banner 728x90

या नाल्याला पुरेसा संरक्षण कठडा आणि बॅरिकेट्स नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांत येथे चार अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील कामे सुरू असल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.


यापूर्वीही नगरसेविका अंजली कदम यांनी या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे काम पुढे गेले नव्हते. त्यामुळे पुन्हा अंजली कदम आणि बांधकाम सभापती कपिल शिर्के यांनी हा विषय गांभीर्याने घेत प्रशासनाच्या अभियंत्यांना घटनास्थळी पाचारण केले.


अभियंत्यांनी या ठिकाणी पाहणी करून मोजमाप घेतले असून नाल्यावर सिमेंटचा संरक्षक कठडा आणि त्यावर तीन टप्प्यांतील बॅरिकेट्स उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर येण्याची शक्यता आहे.


संरक्षक कठडा आणि बॅरिकेट्स उभारल्यानंतर या ठिकाणी होणारे अपघात टळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेविका अंजली कदम तसेच प्रभागातील नागरिक पूर्वा तांदळे, प्रमोद कदम, शिरीष दांडेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *