रत्नागिरी : कोकणनगर येथील अतिक्रमणावर शुक्रवारी हातोडा, विमानतळ रुंदीकरणासाठी कारवाई

banner 468x60

रत्नागिरी शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील प्रलंबित अतिक्रमणे हटवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आता आक्रमक झाली आहे. वारंवार सूचना देऊनही स्वतःहून अनधिकृत बांधकामे न हटवल्याने, येत्या शुक्रवारपासून या मार्गावरील बेकायदेशीर गाळे आणि बांधकामांवर पालिकेचा हातोडा चालणार आहे. ​रत्नागिरी विमानतळ विस्तार आणि रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून विमानतळासाठी ११ केव्हीची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. या कामात रस्त्याच्या कडेला असलेली अनधिकृत बांधकामे मोठा अडथळा ठरत आहेत.

banner 728x90 banner 728x90


​फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरी नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानतळ विकास प्राधिकरण यांनी संयुक्तपणे ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम राबवली होती. त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने सुमारे २५ ते ३० टक्के अतिक्रमण हटवण्यात आले होते. मात्र, कोकणनगर परिसरातील काही गाळेधारकांनी “आम्ही आमची बांधकामे स्वतःहून काढून घेऊ,” अशी विनंती केल्याने प्रशासनाने ही मोहीम तात्पुरती स्थगित केली होती.


​गाळेधारकांना दिलेली एक महिन्याची मुदत संपूनही अद्याप अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे महावितरणला भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने आता शेवटची नोटीस बजावली असून, दोन दिवसांत बांधकामे न काढल्यास ती पाडली जातील, असा इशारा दिला आहे. ​शुक्रवारच्या कारवाईसाठी पालिकेने पोलीस प्रशासनाकडे चोख बंदोबस्ताची मागणी केली आहे. ६ मार्च रोजी सकाळी ही मोहीम सुरू होणार असून, चर्मालय ते कोकणनगर दरम्यानचा मार्ग अतिक्रमणमुक्त केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *