दापोली : मांदिवली रस्त्यावर पुन्हा अपघात, ओव्हरलोड बॉक्साइट डम्पर पलटी

banner 468x60

रोवले–उंबरशेत येथून मांदिवलीकडे येणाऱ्या रस्त्यावर उत्खनन केलेल्या बॉक्साइटने भरलेला ओव्हरलोड डम्पर मंगळवार, दिनांक १३ जानेवारी रोजी अपघातग्रस्त झाला. डम्पर पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

banner 728x90

या मार्गावरून बॉक्साइटने भरलेले डम्पर सातत्याने ओव्हरलोड अवस्थेत व भरधाव वेगाने ये-जा करत असल्याचे चित्र आहे. रस्ता अरुंद व वळणावळणाचा असल्याने वाहनांवरील ताबा सुटून अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

ओव्हरलोड वाहतूक, रस्त्यांची खराब अवस्था तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या रस्त्यावरून शाळकरी मुले, शेतकरी, दुचाकीस्वार तसेच पादचारी यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनाने या मार्गावरील ओव्हरलोड डम्पर वाहतूक तात्काळ बंद करावी, वेगमर्यादा लागू करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *