रत्नागिरी : कचरा डेपोत आढळले जिवंत नवजात अर्भक; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे बालकाचे प्राण वाचले

banner 468x60

रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर झोपडपट्टी परिसरातील कचरा डेपोत शनिवारी (१० जानेवारी) सायंकाळच्या सुमारास अवघ्या एक दिवसाचे जिवंत नवजात पुरुष जातीचे अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

banner 728x90

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी जितेंद्र उर्फ दादा कदम यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दादा कदम यांच्यासह आनंद कट्टीमणी, परशुराम धोत्रे आणि सागर चव्हाण यांनी तातडीने त्या अर्भकाला उचलून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सध्या या नवजात अर्भकावर रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली आहे.

माहिती मिळताच शहर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे उघड्यावर टाकून देणाऱ्या निर्दयी माता-पित्याचा शोध घेणे हे शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच रुग्णालयांमधील प्रसूती नोंदी तपासल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *