हर्णे : दारूच्या व्यसनातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे मोठीगोडीबाव येथील एका ४२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. रूपेश सुरेश वाघमारे असे मृताचे नाव असून, दारूच्या व्यसनातून कुटुंबात होणाऱ्या वादामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या घटनेमुळे हर्णे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश वाघमारे याला दारू पिण्याचे मोठे व्यसन होते. याच कारणावरून त्याचे आणि त्याच्या आईचे वारंवार वाद होत असत. १० मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास याच मानसिक तणावातून रूपेशने आपल्या घराच्या वरील मजल्यावरील खोलीच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले.मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.


उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी पहाटे ३:२५ वाजण्याच्या सुमारास तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मृताची आई सुरेखा सुरेश वाघमारे यांनी दापोली पोलिसांना दिली.

त्यानुसार १० मार्च रोजी सायंकाळी ४:३९ वाजता दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी अमृ. क्रमांक २६/२०२६ आणि बी.एन.एस.एस. १९४ नुसार या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मद्यपानाच्या आहारी गेलेल्या तरुणाच्या अशा अनपेक्षित निधनाने वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *