रत्नागिरी शहरानजीकच्या मिर्या गावातील मिरकरवाडा येथे एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जयेंद्र उर्फ बावा नार्वेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज 7 मार्च सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास जयेंद्र उर्फ बावा नार्वेकर हे मिरकरवाडा येथील मच्छिमार बोटीवर काम करत असताना काही अज्ञात व्यक्ती अचानक तेथे आले. त्यांनी धारदार शस्त्राने नार्वेकर यांच्यावर सपासप वार केले. तब्बल ९ वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर जखमी नार्वेकर यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी भाटी मिर्या परिसरात शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी काढण्यावरून काही तरुणांमध्ये वाद झाला होता. नवलाई पावणाईच्या पालखीच्या मार्गावर रांगोळी काढताना लागलेल्या धक्क्यावरून सुरू झालेली बाचाबाची काही वेळातच मोठ्या वादात परिवर्तित झाली होती. या घटनेत शंभर ते दीडशे लोकांचा जमाव जमल्याचीही चर्चा होती. त्यावेळी काही मध्यस्थांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला होता.
या वादाचीच पार्श्वभूमी लक्षात घेता नार्वेकर यांच्यावर झालेला हा हल्ला त्या घटनेशी संबंधित असावा, अशी चर्चा मिर्या परिसरात सुरू आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणी केला आणि त्यामागे किती जणांचा सहभाग आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















