चिपळूण तालुक्यातील कौंढरे ताम्हाणे गावात कौटुंबिक वादातून एका विवाहितेला पती आणि सासूने गंभीर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, पीडितेने दुसऱ्या दिवशी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार दुखापत आणि मारहाणीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मनाली दिपेश भोबस्कर (वय २८) ही महिला जखमी झाली असून, तिने दिलेल्या तक्रारीवरून पती आणि सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे की, दि. २८ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास मारहाणीची घटना घडल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी, दि. २९ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी, त्या आपला लहान मुलगा आयांश याला सोबत घेऊन जाण्यासाठी निघाल्या असता, त्यांचे पती, दिपेश शिवाजी भोबस्कर (वय २८, रा. कौंढरे ताम्हाणे) यांनी त्यांना विरोध केला. “मुलाला घेऊन जाऊ नको,
त्याला कोठेही घेऊन जाऊ देणार नाही,” असे म्हणून त्यांनी आयांशला फिर्यादीसोबत पाठवले नाही.
यानंतर फिर्यादी घराबाहेर रस्त्यावर उभ्या असताना, दिपेश भोबस्कर याने घराबाहेर ठेवलेली बांबूची काठी घेऊन मागून धावत येऊन रस्त्यावर गाडीची वाट पाहत असलेल्या पत्नीच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि डाव्या मांडीवर काठीने जोरदार प्रहार केले आणि शिवीगाळ केली. त्याच वेळी श्रध्दा शिवाजी भोबस्कर (वय ६५, रा. कौंढरे ताम्हाणे) या सासूने तेथे धाव घेतली. त्यांनीही फिर्यादीच्या अंगावर धावून जात त्यांचे केस पकडले आणि हाताच्या थापटाने त्यांना मारहाण केली. या गंभीर मारहाणीमुळे फिर्यादी जखमी झाल्या असून, त्यांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही आरोपी पती,सासूविरुद्ध गु.आर.नं. २४७/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













