राजापूर : कुपनवर बक्षिसाचे आमिष दाखवून राजापुरात अनेकांची फसवणूक

banner 468x60

स्क्रॅच कुपनवर मोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवत एका टोळक्याने राजापूर शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना हजारो रुपयांना फसवल्याचा प्रकार समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी राजापूर शहरातील अनेकांना या टोळक्याने गंडा घातल्याचे समोर आले आहे.

banner 728x90

या टोळक्यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले आहे. मात्र आपले हसे होईल, या भीतीने अनेकांनी तक्रार देणे टाळले आहे.या कुपनवर शुभांगी एंटरप्राईजेस, राजारामपुरी, ८ वी गल्ली, कोल्हापूर असा उल्लेख आहे. मात्र, दूरध्वनी क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर त्यावर नाही. त्यामुळे या पावत्या खोट्या छापून घेण्यात आल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या कुपनची किंमत शंभर रुपये आहे. या टोळक्यातील एखादी महिला प्रथम घरात जाते आणि औषधे घेण्यासाठी पाणी मागते. गप्पा मारता मारता आपण एका कंपनीचे काम करत असून, बक्षिसांचे आमिष दाखवत शंभर रुपयांचे कुपन घेण्यास सुचवते. जर कोणी सहज कुपन घेतले तर त्याला अजून कुपन घेण्याच्या मोहात पाडले जाते.

प्रत्येक कुपनवर काही ना काही लागतेच, असे सांगून मोठी इलेक्ट्रिक वस्तू ज्या कुपनवर आहे, त्याचा ॲडव्हान्स ही महिला घेते. पाच मिनिटात तुमची वस्तू आमच्या गाडीतून घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही फोटो काढण्यासाठी तयारीत करा, असे सांगून तिथून निघून जाते.या कुपनवर २२ इंची एलईडी टीव्ही, शिलाई मशीन, फ्रीज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, मोबाइल, मिक्सर व इस्त्री, ग्लास टॉप शेगडी अशा जवळपास १६ इलेक्ट्रिक वस्तूंचा समावेश आहे.

यातील जी वस्तू कुपन स्क्रॅश केल्यावर लागेल ती अर्ध्या किमतीत घरपोच मिळण्याचे आमिष दाखवण्यात येते. अनेक लोक या फसवणुकीला बळी पडले आहेत. काही जणांनी पोलिस स्थानकात धाव घेतली आहे. पोलिस काय करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *