तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. ही हत्या पायधुनी परिसरात घडल्यामुळे या प्रकरणाचा तपास पायधुनी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
अवघ्या चार तासांत या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली असून त्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 11 येथे दोन मूकबधीर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये चढत होते.
या दोघांकडे चाकं असलेली एक बॅग होती. मात्र, ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना या दोघांची प्रचंड दमछाक झाली होती. बॅगेच्या प्रचंड वजनामुळे या दोघांना ही बॅग तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढवताना चांगलाच घाम फुटला होता. त्यावेळी या फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे हे गस्तीवर होते.
त्यांना या दोन्ही व्यक्तींची हालचाली बघून संशय आला. त्यामुळे त्यांनी या दोघांना थांबवून बॅग उघडायला सांगितली. ही बॅग उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. या बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह कोंबून ठेवला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली.
या तपासणीत हा मृतदेह अर्शद अली सादिक अली शेख (वय 30) याचा असल्याचे समजले. अर्शद हा सांताक्रुझच्या कलिना परिसरात राहायला होता. शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोन मूकबधिरांनी सादिक अली शेख याची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी त्याच्या मृतदेहाची कोकणात नेऊन विल्हेवाट लावायचे ठरवले होते.
त्यासाठी दोघांनी अर्शदचा मृतदेह बॅगेत भरला आणि ते तुतारी एक्स्प्रेसने कोकणात निघाले होते. मात्र, पोलिसांनी संशय येऊन त्यांनी दोघांना हटकल्याने हा सगळा प्रकार उघडकीला आला. प्राथमिक तपासात शिवजित सिंह आणि प्रवीण चावडा या दोघांनी मिळून अर्शद अली शेख याची हत्या केल्याचे समजले.
शिवजित सिंह घटनास्थळावरुन पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी प्रवीण चावडा याच्याकडून माहिती घेऊन त्याला उल्हासनगरमधून ताब्यात घेतले. गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे. आता याप्रकरणाची पुढील तपासणी करुन पोलिसांकडून शिवजित सिंह आणि प्रवीण चावडा या दोघांवर आरोपपत्र दाखल करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*