चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) बहादूरशेखनाका येथे कोसळलेल्या पुलावरील लाँचर काढण्यात आला. त्यानंतर लटकलेले गर्डर काढण्याचे काम सुरू झाले आहे.
या घटनेमुळे बांधकामातील त्रुटी उघड झाल्या. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे डिझाईन बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पिलरमधील गाळ्यांची लांबी निश्चित करताना अतिरिक्त पिलर उभारणीसह अनेक बदल सुचवण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांहून अधिककाळ रखडण्याची चिन्हे आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किमीदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रूंदी ४५ मीटर इतकी असून, हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांब ठरणार आहे.
या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून, बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू झाले होते; मात्र कामाला गती नसताना गेल्या ऑक्टोबर महिन्यात या पुलाचा काही भाग कोसळला. यानंतर त्याच्या उभारणीवर टीका सुरू झाली होती.
त्यातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्यानंतर त्यावर मंथन सुरू झाले. केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. सध्या या समितीकडून अंतिम अहवाल प्राप्त झालेला नाही; मात्र अहवाल येण्यापूर्वी आता महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्ये काही बदल सुचवले आहेत.
यामध्ये सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले आहेत. त्यामधील अंतर हे २० मीटरवर ठेवून तेथे अतिरिक्त पिलर उभा करून गर्डर सिस्टिम करण्याचे सुरू आहे. त्याबरोबर उड्डाणपूल बांधकामातील तज्ज्ञ कंत्राटदार कंपनी शोधण्याचे कामही सुरू झाले आहे;
मात्र हा प्रस्ताव अजूनही प्राथमिक स्तरावरील असला, तरी त्याला लवकरच अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













