वाशिष्ठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी एमआयडीसीने २५ कोटीचा निधी २०१७ मध्ये मंजूर केला होता; मात्र नागरिकांचा विरोध असल्याचे कारण देत जलसंपदा विभागाने बंधारा बांधण्याकडे दुर्लक्ष केले.
सहा वर्षानंतर आता चिपळूण शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी वाशिष्ठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी केली आहे. लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या मागणीची दखल त्या वेळी घेतली असती तर आज नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून तयार झाला असता, असे जाणकारांचे मत आहे.
चिपळूण शहराच्या जवळहून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केली होती.
वाशिष्ठी नदीतून वाहणारे सुमारे २४ एमएलडी पाणी एमआयडीसी उचलते आणि ते उद्योजकांना पुरवते. त्याशिवाय चिपळूण शहर आणि परिसरातील गावांच्या पिण्याची पाणी योजनासुद्धा वाशिष्ठी नदीवर अवलंबून आहे.
सध्या कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा असल्यामुळे वाशिष्ठी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे निम्म्या चिपळूण शहराला मचूळ पाणीपुरवठा होत आहे. हा प्रश्न गेली कित्येक वर्षे भेडसावत आहे. वाशिष्ठी नदी कोरडी पडल्यानंतर उद्योजकांना पाणी मिळत नाही.
त्यावर उपाययोजना करण्याकरिता लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. पटवर्धन यांनी तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम, सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून २५ कोटीचा निधी मंजूर करून घेतला होता. वाशिष्ठी नदीवर बंधारा बांधण्यासाठी उद्योजक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, एमआयडीसी आणि इतर कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता;
मात्र वाशिष्ठी नदीवर बंधारा बांधण्यासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचे जलसंपदा विभागाने कळवल्यानंतर ही मागणी मागे पडली. चिपळूण शहराला सध्या मचूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी नदीवरील जुना पूल न तोडता तेथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी आता सर्व पक्ष नागरिक करत आहेत. २०१७ मध्ये मंजूर झालेल्या बंधाऱ्याची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झाले असते तर मागील सहा वर्षात बंदराचे काम पूर्ण होऊन चिपळूणचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला असता, असे जाणकार सांगत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













