सर्वात मोठी बातमी – BIG BREAKING NEWS जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांत बदल7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी

banner 468x60

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. यानुसार, पूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी, तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.

banner 728x90

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्रांची छाननी, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप बाकी होते.

दरम्यान, मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 नंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्याने राज्य शासनाने 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यात दुखवटा जाहीर केला. या कालावधीचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये आवश्यक बदल करण्याचा निर्णय घेतला.

सुधारित कार्यक्रमानुसार, संबंधित जिल्हाधिकारी 31 जानेवारी 2026 रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यामुळे निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता समाप्त होईल.

तसेच 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार असून, निकाल जाहीर होताच संबंधित ठिकाणची आदर्श आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *