दापोली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम असा असणार, तालुक्यात ५ फेब्रुवारीला मतदान

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा परिषद व दापोली पंचायत समितीच्या सन २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात येणार असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद व दापोली पंचायत समितीचा समावेश आहे.

banner 728x90

दापोली तालुक्यात एकूण ६ निवडणूक विभाग व १२ निर्वाचक गण असून, यासाठी २१३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिनांक १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ असा असून, अर्ज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्राप्त अर्जांची छाननी करून २२ जानेवारी २०२६ रोजी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २३, २४ व २७ जानेवारी २०२६ अशी असून, सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत अर्ज मागे घेता येणार आहेत. दि. २५ जानेवारी (रविवार) व दि. २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या सार्वजनिक सुट्ट्या असल्याने त्या दिवशी प्रक्रिया होणार नाही. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० नंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

वरील सर्व नामनिर्देशन व संबंधित निवडणूक प्रक्रिया मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, दापोली यांच्या कार्यालयात पार पडणार आहे.

दापोली तालुक्यातील २१३ मतदान केंद्रांवर दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. तालुक्यातील एकूण मतदारसंख्या १,४०,५५८ इतकी असून, त्यामध्ये ६६,६६७ पुरुष मतदार व ७३,८९१ स्त्री मतदार आहेत.

निवडणुकीची मतमोजणी व निकाल दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जाहीर करण्यात येणार असून, मतमोजणी सर विश्वेश्वरय्या सभागृह, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे होणार आहे.

सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण १२१७ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन डॉ. विजयकुमार सुर्यवंशी निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 तथा उपविभागीय अधिकारी, दापोली प्रशासन व निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *