दापोली : ‘कोच’ वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध

banner 468x60

दापोली तालुक्यातून वनस्पतीशास्त्रातील एका महत्त्वाच्या शोधची नोंद करण्यात आली आहे. निगडे गावातील सड्यावर निसर्ग अभ्यासकांना ‘कोच’ कुळातील एका नवीन वनस्पतीचा शोध लागला असून, कोकणाच्या नावावरून या प्रजातीचे ‘लेपिडागॅथिस कोकणेन्सिस’ असे नामकरण करण्यात आले आहे. कोकणातील सड्यांवरील संपन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी गेल्या काही काळापासून संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.

banner 728x90

याच सड्यांवर प्रामुख्याने आढळणाऱ्या आणि स्थानिक भाषेत ‘कोच’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीवर अनंत पाटील, सुहास कदम, अक्षय जंगम, अजय संजय दिवे आणि रोहित माने या शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन केले आहे. शरीराला टोचणाऱ्या काट्यांमुळे स्थानिक लोक याला कोच असे म्हणतात, तर शास्त्रीय भाषेत याला लेपिडागॅथिस संबोधले जाते. महाराष्ट्रात या कुळातील आतापर्यंत १७ प्रजातींची नोंद आहे.


संशोधकांनी दापोलीतील निगडे सड्यावरून गोळा केलेल्या नमुन्यांची तुलना यापूर्वीच्या ज्ञात प्रजातींशी केली असता, या नवीन प्रजातीची फुले, बिया आणि फुलोरा पूर्णपणे भिन्न असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, ही वनस्पती कडक उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते एप्रिल दरम्यान बहरते आणि मे महिन्यापर्यंत तिला फळे येतात. ज्या काळात सड्यावरील निसर्ग पूर्णपणे कोरडा आणि निर्जीव वाटतो, अशा कठीण परिस्थितीतही ही वनस्पती तिथे डौलाने उभी असते, हे या संशोधनातून प्रकर्षाने समोर आले आहे. निगडे पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील धातोंडी, कात्रादेवी, पन्हाळे काजी आणि सागवे या गावांच्या परिसरातही ही नवी प्रजात संशोधकांना दिसून आली आहे. या शोधामुळे कोकणातील सड्यांचे पर्यावरणीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, उन्हाळ्याच्या काळातही येथील अधिवास किती समृद्ध असतो याची प्रचिती या वनस्पतीमुळे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *