कोकणातील फणस प्रक्रिया उद्योगाला जागतिक ओळख मिळवून देणारे आणि ‘फणसकिंग’ या नावाने सुपरिचित असलेले रत्नागिरीचे प्रगतशील उद्योजक मिथिलेश देसाई यांची ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर’ (MACCIA) या राज्याच्या शिखर संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये ‘स्वीकृत सदस्य’ (Co-opted Member) म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली असून, देसाई यांच्या निवडीमुळे कोकणातील कृषी आणि प्रक्रिया उद्योगाला राज्यस्तरावर मोठे प्रतिनिधित्व मिळाले आहे. सन २०२७ मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. या ऐतिहासिक टप्प्यावर उद्योगांच्या विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जाणार असून, त्यामध्ये मिथिलेश देसाई यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मिथिलेश देसाई यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांतून फणसासारख्या दुर्लक्षित फळाला बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून दिले आहे. त्यांनी विकसित केलेले फणसाचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहोचले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘फणसकिंग’ ही पदवी प्राप्त झाली असून, ग्रामीण तरुणांना रोजगाराची नवी दिशा दाखवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या अनुभवाचा उपयोग आता महाराष्ट्र चेंबरच्या
माध्यमातून राज्यातील इतर उद्योजकांना आणि विशेषतः कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांना होणार आहे. गव्हर्निंग कौन्सिलमध्ये कार्यरत राहून व्यापार आणि उद्योग विकासासाठी त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी विनंती चेंबरच्या वतीने करण्यात आली आहे. या निवडीबद्दल देसाई यांच्यावर कोकणातील उद्योजक, व्यापारी आणि राजकीय स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













