राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकांचा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात आता राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. आयोगाकडून (Election commission) निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम
या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होणार असून 21 जानेवारीपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल.
एखाद्या उमेदवाराला आपला अर्ज मागे घ्यायचा असेल, तर त्यासाठी 27 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होतील.
या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणूक
राज्यातील प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांतही निवडणूक होत आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा या यादीत समावेश आहे. या सर्व ठिकाणी जिल्हा परिषदेसोबतच 125 पंचायत समित्यांसाठीही मतदान होईल.
मतदारांना द्यावी लागणार 2 मतं
या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदाराला दोन मतं द्यावी लागणार आहेत. मतदाराला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या बॅलेट पेपरवर किंवा बटणांवर मतदान करावे लागेल. यामध्ये एक मत जिल्हा परिषद विभागाच्या उमेदवारासाठी असेल, तर दुसरे मत पंचायत समिती गणाच्या उमेदवारासाठी द्यावे लागेल. या प्रक्रियेसाठी आयोगाने 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली असून, त्यानुसारच मतदान प्रक्रिया पार पडेल.
आरक्षण आणि जागांचे गणित
12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 731 निवडणूक विभाग आहेत. यामध्ये महिलांसाठी 369 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी 83, अनुसूचित जमातीसाठी 25 आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 191 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, 125 पंचायत समित्यांमध्ये एकूण 1462 सदस्य निवडले जाणार आहेत. यात महिलांसाठी 731, अनुसूचित जातीसाठी 166, अनुसूचित जमातीसाठी 38 आणि ओबीसी प्रवर्गासाठी 342 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकांचा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात आता राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













