खेड: लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी बंद न झाल्यास 21 जानेवारीपासून लोटे येथे बेमुदत धरणे आंदोलन

banner 468x60

लोटे एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीद्वारे उत्पादित होणाऱ्या ‘पी-फास’ या घातक रसायनामुळे मानवी जीवन आणि प्राणीमात्रांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करत, कोकण नागरी संघर्ष समितीने प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

banner 728x90

यासंदर्भात समितीचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून, २० जानेवारीपर्यंत सदर कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी २२ डिसेंबर २०२५ रोजी समितीने तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ८ जानेवारी २०२६ रोजी माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० स्त्री-पुरुषांचा मोर्चा कंपनीवर नेण्यात आला होता.

यावेळी कंपनी व्यवस्थापन, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत प्रदूषणबाधितांचे समाधान न झाल्याने आता संघर्षाची भूमिका अधिक तीव्र करण्यात आली आहे.


येत्या २० जानेवारीपर्यंत तज्ज्ञ समिती आणि हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कंपनी कायमची बंद करण्याचा निर्णय न घेतल्यास, २१ जानेवारी २०२६ पासून कंपनीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनात लोटे परिसरातील १८ ते २० गावे, विविध सामाजिक संस्था, प्रदूषण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आणि सर्व राजकीय पक्ष सहभागी होणार असल्याचे समितीने म्हटले आहे. प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा आणि बैठकीची तारीख निश्चित करावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *