राजापूर : माडबन समुद्रकिनारी वाळू माफियांचा खुलेआम धुडगूस

banner 468x60

माडबन समुद्रकिनारा सध्या निसर्गप्रेमींसाठी नव्हे, तर वाळू माफियांसाठी सुरक्षित अड्डा बनला आहे की काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चार ते पाच बोटींमधून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अधिक धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार उघड होऊनही प्रशासन गाढ झोपेत असल्याचे चित्र समोर आले आहे.

banner 728x90

यामुळे किनाऱ्यावर विणीसाठी येणाऱ्या कासावांच्या घरट्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.आज पहाटे सुमारे पाचच्या सुमारास कासव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात का, याची पाहणी करत असताना समुद्रात संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या चार ते पाच बोटी त्यांच्या निदर्शनास आल्या. किनाऱ्यावर दहा ते पंधरा जण निर्धास्तपणे वाळू उपसा करत होते. कायद्याची भीती नाही, प्रशासनाची धास्ती नाही.

हा प्रकार इतक्या बेधडकपणे सुरू होता की, माफियांचे मनोबल कुणाच्या बळावर वाढले आहे, हा प्रश्नच निर्माण झाला आहे, अशी माहिती माजी पोलीस पाटील शामसुंदर गवाणकर यांनी दिली. आपण एकटे असल्याने त्यांनी तात्काळ गावातील दहा-बारा ग्रामस्थांना सोबत घेत पुन्हा समुद्रकिनाऱ्याकडे धाव घेतली. मात्र ग्रामस्थ जवळ येत असल्याची चाहूल लागताच संबंधित टोळके क्षणात बोटी घेऊन समुद्रात पसार झाले.

म्हणजेच, हा काही योगायोग नव्हता, तर कारवाईची पूर्ण पूर्वतयारी असलेला संघटित गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकाराची माहिती तात्काळ गावचे पोलीस पाटील व संबंधित यंत्रणांना देण्यात आली. मात्र धक्कादायक वास्तव असे की, दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत ना महसूल विभाग, ना पोलीस, ना कोणताही अधिकारी घटनास्थळी फिरकला. इतका गंभीर प्रकार घडूनही यंत्रणा हलत नसेल, तर ही निष्क्रियता की संगनमत? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. स्थानिकांनी सांगितले की, अशाच संशयास्पद बोटी यापूर्वी विजयदुर्ग जेटी परिसरातही पाहण्यात आल्या होत्या. मग प्रश्न असा आहे की, माडबन समुद्रकिनारी रात्री नेमके काय चालते? ही वाळू कुठे जाते? कोणाच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ सुरू आहे?

प्रशासनाच्या संरक्षणाशिवाय असा धुडगूस शक्य आहे का? बेकायदेशीर वाळू उपशामुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. कासवांच्या अंडी घालण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. एकीकडे सागरी सुरक्षा, कोस्टल गार्ड, पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा;

आणि दुसरीकडे माफियांसमोर नतमस्तक प्रशासन हा दुहेरी खेळ नेमका कुणासाठी? या पार्श्वभूमीवर माडबन समुद्रकिनारी दिसलेल्या संशयास्पद बोटी, संबंधित टोळके आणि त्यांना पाठीशी घालणारे घटक यांची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा लोकशक्ती रस्त्यावर उतरेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. “कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का?” हा रोखठोक सवाल उपस्थित केला जावू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *