रत्नागिरी : दुकानांमध्ये रिमोटद्वारे वीज चोरी

banner 468x60

रत्नागिरी शहरातील दुकानांमध्ये स्मार्ट वीज मीटरमधील वीज वापराचे युनिट रिमोटद्वारे (दूरनियंत्रक) कमी करून वीज चोरी करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये महावितरणच्या शहर उपविभागाकडून अशा वीज चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. रिमोटद्वारे वीज चोरी करण्याचे प्रकार धनजी नाका येथील तीन दुकानांमध्ये उघडकीस आले आहेत. यांच्याकडून वीज चोरीची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

banner 728x90


स्मार्ट मीटर बसण्यापूर्वी वीज चोरी करण्याची पद्धत वेगळी होती. यामध्ये वीज मीटरमध्ये फेरफार करणे, मीटरला थेट जोडणी करणे आणि उच्च दाबाच्या वीज वाहिनीवरून वीजपुरवठा घेणे अशी वीज चोरीची पद्धत होती. परंतु, आता स्मार्ट मीटर बसले असून, यातही चोरी करण्याचा नवीन रिमोट फंडा उघडकीस आला आहे. ज्याप्रमाणे रिमोटद्वारे टीव्ही, एसीसारखी उपकरणे लांबून चालवण्याचा रिमोट असतो त्याप्रमाणे मीटरमधील वीज वापर युनिट थांबवण्यासाठी रिमोट वापरण्यात येत आहेत.


रत्नागिरी शहरातील धनजी नाका येथील एका दुकानामध्ये 50 हजार 420 रुपयांची रिमोटद्वारे वीज चोरी झाली. वीजमीटर मालकाकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. त्याचबरोबर नवीन मीटर बसवून देण्याचे 820 रुपये महावितरणकडून घेण्यात आले. इतकेच नव्हे, तर इतर कायदेशीर कारवाई होऊ नये, यासाठी मीटर मालकाने आणखी 10 हजार रुपये तडजोड रक्कम भरण्याची तयारी महावितरणकडे अर्ज करून दाखवली आहे. धनजी नाक्यावरीलच दुसऱ्या एका दुकानात रिमोटद्वारेच 61 हजार 60 रुपयांची वीज चोरी महावितरणच्या पथकाने पकडली.

मीटर ज्याच्या नावावर आहे त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यात आली असून या वीज मीटर मालकाने तडजोडीची 10 हजाराची रक्कम भरून कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लेखी अर्ज केला आहे.


विठ्ठल मंदिर येथील एका लॉजमध्ये मीटरमधून थेट जोडणी दुसऱ्या ठिकाणी घेण्यात आल्याचे दिसून आले. यातून 9 हजार 180 रुपयांची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम वीज मीटर मालकाने भरले असून येथेही तडजोडीची रक्कम भरण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. कारवाई करण्यात आल्या तडजोडीची रक्कम भरण्यासाठी मुमताज विंधाणी, मुनाफ मेमन, दिलीप फाळके यांनी महावितरणकडे अर्ज केले आहेत. अर्जानुसार महावितरण शहर उपविभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता सय्यद यांनी सांगितले. सहाय्यक अभियंता कमलेश घाडगे यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *