खेड : लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात लोटेत भव्य मोर्चा PFAS रसायनांमुळे आरोग्य व पर्यावरण धोक्यात; संघर्ष समितीचा इशारा

banner 468x60

“लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा”, “कोण म्हणतंय होणार नाही? बंद केल्याशिवाय राहणार नाही” अशा तीव्र घोषणांनी गुरुवारी सकाळी लोटे औद्योगिक वसाहत दणाणून गेली. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून निर्माण होणाऱ्या पीफास (PFAS) रसायनांमुळे उद्भवणाऱ्या गंभीर आरोग्य व पर्यावरणीय धोक्यांविरोधात नागरिकांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला.

banner 728x90

या पार्श्वभूमीवर लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सकाळी ११ वाजता भव्य व ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात स्थानिक नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार हुसेन दलवाई आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांनी केले. महामार्गापासून कंपनीच्या मुख्य गेटपर्यंत मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोर्चा कंपनीच्या मुख्य गेटजवळ पोहोचताच पोलिसांनी तो अडवून संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला कंपनी प्रशासनाशी चर्चा करण्याची परवानगी दिली. यावेळी शिष्टमंडळाने कंपनीकडे निवेदन सादर करून PFAS प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, आरोग्यावर होणारे परिणाम आणि पर्यावरणीय हानी याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.

मात्र चर्चेनंतर बाहेर आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपनी प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तसेच सर्व प्रश्नांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे कंपनीचा एकही वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी उपस्थित नव्हता. यासोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही संपूर्ण वेळ अनुपस्थित राहिल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अधिकच वाढला.

या प्रकारामुळे प्रशासनाला कोकणवासीयांच्या आरोग्य, पिण्याचे पाणी आणि पर्यावरणाबाबत कोणतीही चिंता नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नुकतेच पालकमंत्री उदय सामंत यांनी “कोकणातील निसर्गसौंदर्याला हानी पोहोचवणारे प्रकल्प चालू देणार नाहीत” असे स्पष्ट वक्तव्य केले असतानाही कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आश्चर्यकारक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

मोर्चा शांततेत पार पडला असला, तरी नागरिकांमधील संताप व भीती स्पष्टपणे जाणवत होती. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात याहूनही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *