चिपळूण : नोकरीचे आमिष दाखवून चिपळुणात 40 लाखांची फसवणूक

banner 468x60

सरकारी खात्यात नोकरी लावून देतो असे खोटे आश्वासन देत अनेक नागरिकांकडून मोठ्या रकमेची उकळणूक केल्याचा गंभीर प्रकार चिपळूण तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, संशयित आरोपीने सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत तब्बल ४० लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.


banner 728x90

या प्रकरणात महेश भास्कर म्हात्रे (रा. जिते, ता. पेण, जि. रायगड) याच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील फसवणूक, शिवीगाळ व धमकी देण्याचे कलम लावण्यात आले आहेत. हा गुन्हा ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.


याबाबत नितीन श्रीकांत रसाळ (वय ४०, व्यवसाय शेती, रा. बुरंबाड, वरचा वठार, शेवरवाडी, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी म्हात्रे याने स्वतःची ओळख प्रभावशाली व्यक्ती म्हणून करून देत सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या विश्वासावर फिर्यादी रसाळ यांच्याकडून ६ लाख रुपये तसेच इतर सात जणांकडून एकूण १८ लाख २५ हजार रुपये स्वीकारले. मात्र, कोणालाही नोकरी न लावता तसेच घेतलेली रक्कम परत न करता आरोपीने सर्वांची फसवणूक केली.

इतकेच नव्हे तर आरोपीने फिर्यादीच्या नावावर जनता सहकारी बँक व खासगी बँकेत कर्ज प्रकरणे उघडून त्या कर्जाच्या माध्यमातून चारचाकी व दुचाकी वाहनांसह मोबाईल फोन खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या कर्जाचे हप्ते मे २०२४ पासून थकवण्यात आले असून, सध्या सुमारे १६ लाख ६० हजारांहून अधिक रक्कम थकीत आहे. यामुळे फिर्यादीवर मोठा आर्थिक भार पडला आहे.


दरम्यान, पैसे परत मागितल्यावर आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत असून, सरकारी नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *