राजापूर : पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर हल्ला, हल्याचा तीव्र निषेध

banner 468x60

राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची गंभीर घटना गुरुवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून हल्लेखोरांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.

banner 728x90


सिद्धेश मराठे हे सायंकाळच्या वेळेस शिवणे खुर्द गावात गेले होते. ते आपल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून घरी परतत असताना भटवाडी स्टॉपजवळ त्यांचा पाठलाग दोन वाहनांनी केला. यामध्ये पांढऱ्या रंगाची एक कार आणि थार वाहनाचा समावेश होता. काही अंतरावर जाताच मास्क घातलेल्या तीन ते चार जणांनी त्यांची दुचाकी अडवून किल्ली हिसकावून घेतली आणि अचानक मारहाण सुरू केली.


घटनास्थळी अंधार असल्याचा फायदा घेत हल्लेखोरांनी सिद्धेश मराठे यांना हाताने व काठ्यांनी मारहाण केल्याचे सांगितले जाते. मारहाणीनंतर दुचाकीची किल्ली फेकून देत हे सर्वजण देवाचे गोठणेच्या दिशेने पळून गेले. जखमी अवस्थेत सिद्धेश मराठे हे कसेबसे आपल्या घरापर्यंत पोहोचले.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक यादव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.

यावेळी गावचे पोलीस पाटील तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर उशिरा रात्री राजापूर पोलीस ठाण्यात सिद्धेश मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय वातावरण तापलेले असताना पत्रकारावर झालेल्या या हल्ल्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. या घटनेचा निषेध करत दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार संघटना आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *