चिपळूण : चुकून पैसे आल्याचा बनाव रचत चिपळूणच्या रेल्वे अधिकाऱ्याला 58 हजारांचा गंडा

banner 468x60

कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून अज्ञात सायबर चोरट्याने 58 हजार रुपयांना लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाल्याचे भासवून आरोपीने ही फसवणूक केली असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे मध्य प्रदेशचे असलेले आणि सध्या चिपळूण येथे एरिया सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले वीरेंद्रकुमार किशोरीलाल वर्मा हे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर जन शताब्दी एक्सप्रेसची वाट पाहत असताना त्यांना ‘शर्मा’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने वीरेंद्रकुमार यांच्या खात्यात चुकून 95 हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचा दावा केला.

यावेळी वीरेंद्रकुमार यांनी बँकेचा अधिकृत बॅलन्स न तपासता, मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये आलेले बनावट संदेश खरे मानले. कोल्हापूरचा रहिवासी असल्याचे सांगणाऱ्या या भामट्याने पैसे परत करण्याची विनंती करत व्हॉट्सॲपवर एक क्यूआर कोड पाठवला. फसवणूक करणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वीरेंद्रकुमार यांनी क्यूआर कोड स्कॅन करून आठ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण 58 हजार रुपये पाठवले.

मात्र, पुढील व्यवहार करताना तांत्रिक अडचण आल्याने त्यांनी स्वतःचा बँक बॅलन्स तपासला असता, त्यांच्या खात्यातूनच पैसे वजा झाल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. प्राथमिक तांत्रिक तपासणीनंतर चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी अधिकृत गुन्ह्याची नोंद केली असून, पोलीस या सायबर चोरट्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *