चिपळूण : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने महिलेची ३ लाखांची फसवणूक

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील कडप फाटा परिसरात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बिल्डरने फ्लॅटचा ताबा न देता रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड-मुंबई येथील मूळ रहिवासी आणि सध्या डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटल परिसरात वास्तव्यास असलेल्या श्रीमती राजलक्ष्मी अय्यर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी सोजेन करिसिंगल एफ्राईम आणि दीपक सखाराम सावडेकर यांनी ‘फ्रेंड्स डेव्हलपर्स’च्या ‘फ्रेंड्स हाईट्स’ या प्रकल्पात फ्लॅट विकत देतो असे सांगून फिर्यादीकडून ९ लाख रुपये रोख स्वीकारले होते.

हा व्यवहार ४ ऑक्टोबर २०२३ रोजी झाला होता. मात्र, प्रदीर्घ काळ उलटूनही आरोपींनी फिर्यादीला फ्लॅटचा ताबा दिला नाही.
फ्लॅट मिळत नसल्याने फिर्यादी यांनी आपली रक्कम परत करण्याची मागणी आरोपींकडे केली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी ९ लाख रुपयांपैकी ६ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित ३ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजलक्ष्मी अय्यर यांनी पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी आरोपी सोजेन एफ्राईम आणि दीपक सावडेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *