संगमेश्वर : तुरळ येथे चारचाकीचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील मुंबई–गोवा महामार्गावरील मराठवाडी फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. वसईहून गणपतीपुळेकडे जात असलेली ब्रेझा कार रस्त्याच्या कडेला लावलेल्या लोखंडी गार्डरला जोरदार धडकली. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला.

banner 728x90

वसईहून गणपतीपुळेकडे निघालेली ब्रेझा कार (क्र. एमएच ०४ जेव्ही ७१९८) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघातग्रस्त झाली. कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी गार्डरमध्ये घुसली. हा गार्डर चालक सलिम सुलतान खान (वय ४६, रा. वसई) यांच्या मांडीमध्ये घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. जोरदार धडकेमुळे चालक गाडीबाहेर फेकला गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कारमध्ये बाजूला बसलेला त्यांचा मित्र सुखविंदर संधू (वय ४६, रा. मिरारोड) हा झोपेत असल्याने किरकोळ जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण व त्यांचे सहकारी, माजी सभापती कृष्णा हरेकर, बाबू कुंभार आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

सहायक पोलीस निरीक्षक विवेक साळवी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *