लांजा : शिपोशीतील गुन्हेगार दोन वर्षांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून तडीपार

banner 468x60

लांजा तालुक्यातील शिपोशी हनुमानवाडी येथील गुरुनाथ यशवंत तावडे याला रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राजापूर डॉ. जॅसमिन यांनी दिले आहेत.

banner 728x90


शिपोशी हनुमानवाडी येथील रहिवासी असलेल्या गुरुनाथ यशवंत तावडे (वय ४६) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत दोन गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ठ आहेत. यासोबतच भारतीय दंड संहिता कलम ४५७ व ३८० अन्वये घरफोडी व चोरीचे गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत.


तावडे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरट्या दारूविक्रीचा व्यवसाय तसेच घरफोडी व चोरीच्या कृत्यांमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेस धोका निर्माण होत असून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर लांजा पोलीस ठाण्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता.


महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१) व कलम ५७ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून डॉ. जॅसमिन यांनी तावडे याला आदेशाच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी शिपोशी गावासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच जिल्ह्याबाहेर वास्तव्यास गेल्यानंतर तो ज्या ठिकाणी राहील त्या परिसरातील नजीकच्या पोलीस ठाण्यात महिन्यातून एकदा आपला संपूर्ण पत्ता व राहण्याची माहिती देणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *