गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने बुधवारी मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत अवधूत मनोहर चव्हाण (पालशेत) यांचे वाहन अर्धा ब्रास अवैध वाळूसह ताब्यात घेण्यात आले आहे.
गुहागर आणि पालशेत परिसरात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक चालू असल्याची तक्रारी महसूल विभागाकडे येत होत्या. समुद्रकिनारी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही जण मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत असल्याची माहिती मिळाल्यावर विभागाने विशेष पथक तयार केले.
बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पालशेत नाक्यावर तपासणीदरम्यान एक टेम्पो संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. तातडीने कारवाई करत तलाठी एन. एन. पाटील आणि मंडळ अधिकारी पी. व्ही. कानिटकर यांनी संयुक्त कारवाई करून वाहन थांबवले. तपासणीअंती वाहनात अवैधरीत्या उपसलेली अर्धा ब्रास वाळू आढळल्याने ते जप्त करण्यात आले.
गुरुवारी या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. वाहनमालक व संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने या परिसरात गस्त वाढवली आहे.
महसूल विभागाच्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे पालशेत परिसरातील अवैध वाळू उपसा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या या बेकायदेशीर प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













