चिपळूण : तब्बल 7 वर्षे उलटूनही चिपळूण बसस्थानक होईना,निधीअभावी बसस्थानकावर स्लॅबऐवजी बसणार पत्रे?

banner 468x60

चिपळूण बसस्थानकाचे काम 2018 पासून रखडले आहे. रत्नागिरी बसस्थानक पूर्ण झाले असले तरी चिपळूण व लांजा केंद्रांचे काम अद्याप अपूर्ण आहे. चिपळूणमध्ये पायाभूत कामानंतर चार वर्षे बांधकाम थांबले होते. लोखंडी सळई गंजू लागल्याने धोका निर्माण झाला होता. दोन ठेकेदार बदलल्यानंतर तिसऱ्या ठेकेदाराने काम सुरू केले; मात्र आता एसटी महामंडळाच्या अभियंता विभागाने मूळ आराखड्यात बदल सुचवला आहे.

banner 728x90

कधी निधीचा प्रश्न तर कधी ठेकेदाराची दिरंगाई, यामुळे तब्बल सात वर्षे उलटूनही येथील बसस्थानक इमारतीच्या कामाला गती आलेली नाही. कोकणातील मध्यवर्ती व चोवीस तास सेवा देणाऱ्या या इमारतीच्या मूळ आराखड्यात आता बदल करण्यात आला असून, स्लॅबऐवजी पत्रा शेड टाकण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे नवीन डिझाइन उपलब्ध होताच हे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना आणखी काही काळ हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत.

जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, लांजा या तीन प्रमुख बसस्थानकांचे काम सन २०१८ पासून सुरू आहे. यातील रत्नागिरी बसस्थानकाचे काम पूर्णत्वास गेले असले तरी उर्वरित बसस्थानकांचे काम रखडले आहे. येथील इमारतीच्या पायथ्याचे काम पूर्ण केल्यानंतर ते ४ वर्षे काम तसेच पडून होते. त्यातील लोखंड गंजल्याने मूळ बांधकामाला धोका निर्माण झाल्याची ओरड सुरू होती. अशातच पुन्हा हे काम सुरू करण्यात आले.

चिपळूणच्या हायटेक बसस्थानकाच्या कामासाठी सलग दोन ठेकेदार बदलल्यानंतर तिसऱ्या ठेकेदाराकडे हे काम देण्यात आले. त्यानेही पोटठेकेदाराकडे ही जबाबदारी सोपवल्यानंतर महिनाभरापूर्वी या कामाला पुन्हा जोमाने सुरुवात झाली. मात्र, आता या इमारतीच्या रचनेतच बदल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या दुमजली इमारतीत नियंत्रण कक्षासह हायटेक पद्धतीच्या सुविधा देण्यात येणार होत्या. मात्र, आता दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब रद्द करून त्याऐवजी पत्राशेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या अभियंता विभागाने ठेवला आहे.

या कामासाठी २०१६-१७ च्या दरानुसार सुमारे २ कोटी ९० लाख इतका निधी मंजूर आहे. मात्र, आता दरवाढीमुळे या निधीत हे काम पूर्ण होणार नसल्याने व वाढीव निधीची मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर आराखड्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *