रत्नागिरी : हरवलेले, चोरीस गेलेले 187 मोबाईल मूळ मालकांना परत, रत्नागिरी पोलिसांची कामगिरी

banner 468x60

हरवलेले, चोरीस गेलेले 187 मोबाईल मूळ मालकांना रत्नागिरी पोलिसांनी दिले आहेत.
मोबाईल हरवला किंवा गहाळ झाला तर तो पुन्हा मिळण्याची शक्यता फार कमी असते, असा समज अनेकदा पाहायला मिळतो. मात्र, हा समज खोटा ठरवत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक मोठी कामगिरी करून दाखवली आहे.

banner 728x90

मार्च २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात गहाळ झालेले तब्बल १८७ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, आज हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय दराडे यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.

रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक. बी. बी. महामुनी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने ही मोहीम राबवली होती. सायबर पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांनी एकत्रितरीत्या काम करत हे यश मिळवले आहे. यामध्ये सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोलीस शिपाई अजिंक्य ढमढेरे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईलचा शोध घेण्यात मोलाची भूमिका बजावली. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळाले.


२४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक. संजय दराडे यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. याप्रसंगी बोलताना. दराडे यांनी उपस्थितांना सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, कोणत्याही आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नका, तसेच फसवणूक झाल्यास किंवा संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.


या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक. बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी (रत्नागिरी). निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (लांजा). सुरेश कदम यांच्यासह पोलीस दलातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांची गहाळ झालेली मालमत्ता परत मिळवून देत रत्नागिरी पोलिसांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *