चिपळूण : “पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये, नेट द्या मत घ्या” तळवडे गावकऱ्यांचा बॅनर चर्चेत

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील तळवडे गावात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि राजकीय पुढार्‍यांना विचार करायला लावणारा फलक (बॅनर) लागला आहे. पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये, आमच्या भावना समजून घ्या… नेट द्या, मत घ्या! असा थेट आणि स्पष्ट संदेश देणारा हा बॅनर सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

banner 728x90

हा बॅनर कोणी लावला, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, गावातील नागरिकांनी विकासकामांच्या मुद्यावर आता कोणतीही कोरी आश्वासने स्वीकारायची नाहीत, अशी ठाम भूमिका घेतल्याचे यातून स्पष्ट होत आहे.


तळवडे गावात सध्या इंटरनेट अर्थात मोबाईल टॉवरची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. देशात आणि राज्यात डिजिटल क्रांती झाली असताना तळवडे गाव मात्र आजही डिजिटल अंध:कारात आहे. शिक्षण, आरोग्य, बँकिंग व्यवहार, सरकारी योजनांची माहिती तसेच ऑनलाईन सेवा अशा प्रत्येक अत्यावश्यक बाबींसाठी इंटरनेट अनिवार्य असतानाही गावातील एकाही टेलिकॉम कंपनीचा मोबाईल टॉवर उभारला गेलेला नाही. यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येचे पडसाद आता थेट निवडणुकांच्या तोंडावर उमटले आहेत.

तळवडे गाव म्हणतंय आता गावात इंटरनेट कनेक्शन पाहिजेच! असा स्पष्ट इशारा देत गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या संभाव्य गावभेटींवर एकप्रकारे बहिष्कार टाकल्याचे चित्र आहे. गावातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार वर्ग इंटरनेटअभावी सर्वाधिक त्रस्त आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी गावातून बाहेर जावे लागते. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना, बँकेचे व्यवहार तसेच रोजगाराच्या संधींची माहिती वेळेत मिळत नाही. काही वेळा महत्त्वाची, विशेषतः दु:खद माहिती वेळेत न पोहचल्याने गैरसोयींना सामोरे जावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.


सध्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याने अनेक राजकीय नेते तळवडे गावात मतदारांच्या भेटीगाठीसाठी येत आहेत. मात्र, गावात लावलेला हा बॅनर त्यांना थेट आव्हान देत आहे. निव्वळ आश्वासने देऊन मते मिळवण्याचा काळ आता संपला असून, ग्रामस्थ आता आधी विकास, मग मत या भूमिकेवर ठाम असल्याचे या बॅनरने दाखवून दिले आहे. या लक्षवेधी फलकामुळे आता तरी संबंधित कंपन्या आणि राजकीय नेते तळवडे गावातील इंटरनेटच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बॅनरच्या संदर्भात तळवडेच्या सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *