गाणे-खडपोली येथील ‘साफ यीस्ट कंपनी’ विरोधात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले कामगारांचे आमरण उपोषण अखेर आज बुधवारी (१९ नोव्हेंबर) मागे घेण्यात आले. या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची दखल घेतली आणि त्यानंतर तातडीने मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कामगारांच्या मागणीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कामगारांच्या प्रश्नाची वाढती गंभीरता लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून त्यांना येथील संपूर्ण स्थितीची माहिती दिली. या पाठपुराव्यानंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत ‘साफ यीस्ट’ कंपनीतील २२० कामगारांपैकी तब्बल २०० कामगारांना तात्काळ कामावर घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे उपोषणकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, उर्वरित २० कामगारांच्या प्रश्नावरही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. सदर २० कामगारांचा प्रश्न आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत मार्गी लावण्यात येईल, असे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना देण्यात आले. या आश्वासनानंतर कामगारांनी आपले आमरण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. आमदार निकम आणि प्रशासनाने केलेल्या जलद मध्यस्थीमुळे कामगारांना न्याय मिळून हा तिढा सुटल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













