चिपळूण : मीटरमध्ये छिद्र पाडून वीजचोरी, गोवळकोट येथील एकावर गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण गोवळकोट रोडवरील लतीफा अपार्टमेंटमध्ये एका ग्राहकाने वीजमीटरमध्ये लबाडी करून थेट ९५१ युनिट्सची वीजचोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीटरच्या मागील बाजूस ड्रीलने छिद्र पाडून तांब्याची वायर लूप केल्यामुळे सदर मीटर संथ गतीने रीडिंग घेत असल्याचे महावितरणच्या तपासणीत उघड झाले.

banner 728x90

याप्रकरणी महावितरण कंपनीचे तब्बल १०,१७० रुपयांचे (दहा हजार एकशे सत्तर रुपये) आर्थिक नुकसान झाले असून, चिपळूण शहर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या चिपळूण शहर कार्यालयाच्या वतीने सहाय्यक अभियंता नितीन शंकर कांबळे (वय ५१, रा. पाग, चिपळूण) यांनी १५ नोव्ह २०२५ रोजी दुपारी २.२३ वाजता याप्रकरणी फिर्याद दाखल केली.

फिर्यादीनुसार, गोवळकोट रोडवरील लतीफा अपार्टमेंटमध्ये राहणारा आरोपी अशफाक ए. गफर मेमन (वय ४०) याच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी मेमन याने २८ जून २०२५ पासून १३ नोव्ह २०२५ पर्यंतच्या कालावधीत ही वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता, आरोपीच्या मीटरच्या (मेक-जीनस, सिरीयल नंबर ४२५१११८७०५४) मागील बाजूस ड्रीलच्या सहाय्याने छिद्र पाडलेले आढळले. या छिद्रातून तांब्याच्या वायरचा तुकडा (लूप) आतमध्ये टाकण्यात आला होता, ज्यामुळे मीटरची वीज मोजणीची गती ६३.६०७ इतकी संथ झाली होती.

या गैरप्रकारामुळे आरोपीने सुमारे ९५१ युनिट्सची वीजचोरी करून कंपनीचे रु. १०,१७०/- रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. पोलिसांनी पंचनामा करून सदोष मीटर जप्त केले आहे. आरोपी अशफाक मेमन याच्यावर भारतीय विद्युत अधिनियम कायदा २००३ (सुधारित कायदा २००७) च्या कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदवून पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *