चिपळूण : दोन सराईत गुन्हेगार तडीपार

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. या आदेशांच्या अनुषंगाने सावर्डे पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांविरोधात हद्दपारीची ठोस कारवाई करण्यात आली आहे.

banner 728x90

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे पोलीस ठाण्याकडून संबंधित दोन्ही गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1)(ब) नुसार एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, चिपळूण यांच्या न्यायालयात पाठविण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान उपविभागीय अधिकारी आणि दंडाधिकारी आकाश लिगाडे यांनी हा प्रस्ताव मान्य करून खालील दोन्ही सराईत गुन्हेगारांना रत्नागिरी जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. सुमित अविनाश झिंगे (वय 28, रा. निवळी कोष्टेवाडी, ता. चिपळूण) गावठी हातभट्टीद्वारे दारू निर्मिती व विक्रीसह एकूण 7 गुन्हे दाखल, यासिन महमूद काद्री (वय 60, रा. सावर्डे, अडरेकर मोहल्ला) साथीदारांसह अंमली पदार्थ सेवन व बेकायदेशीर ताबा याबाबत एकूण 3 गुन्हे दाखल.

या कारवाईत सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी पुढाकार घेतला. या प्रस्तावाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलीस अंमलदार पोकॉ रमेश जड्यार, पोहेकॉ मिनाद कांबळे आणि महिला पोहेकॉ निता गमरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. हद्दपारीच्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर निर्भयता निर्माण होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *