चिपळूण : महायुतीची संभ्रमावस्था ; राष्ट्रवादी, अजित पवार गट ॲक्शन मोडवर

banner 468x60

महायुतीमधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून युतीच्या राजकीय दौडीचे घोडे अडले आहे. त्यातूनच निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर अजित पवार राष्ट्रवादी गट ॲक्शन मोडवर आला आहे.

banner 728x90

गेल्या चार दिवसांत घडलेल्या महायुतीमधील राजकीय घडामोडींची रिॲक्शन पक्षाच्या वर्तुळात उमटली. त्यातूनच आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीतील इच्छुक उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सायंकाळी उशिराने झाली.


महायुतीमध्ये सुरू झालेल्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाची रिॲक्शन हळूहळू उमटू लागली आहे. प्रामुख्याने अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून सामंजस्याची भूमिका घेऊन देखील निर्णय प्रक्रियेत सन्मानजनक तोडगा निघत नसल्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याबाबत पुढील रणनिती ठरवण्यासाठी बुधवारी सायंकाळी उशिराने आमदार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला शहरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.


या बैठकीत वेळप्रसंगी स्वबळावर लढण्यासह अन्य राजकीय पक्षाशी जवळीक करण्याच्या विषयाची चाचपणी झाल्याचे महायुतीच्या राजकीय वर्तुळातून सांगितले जाते. त्यामुळे प्राथमिक स्तरावर महायुतीमधील अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या इच्छुकांनी आपापल्या प्रभागात उमेदवारी अर्ज भरून ठेवण्याबाबत संकेत दिले गेल्याचे समजते.

महायुती झाल्यास जागा वाटपात त्या-त्या ठिकाणच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचीही तयारी ठेवावी, अशी एकूणच चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे. एकूणच चिपळूणातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *